सोमरस ते दारू; एक प्रवास
अनेकदा सोमरसाची तुलना दारूशी केली जाते. प्राचीन काळात देव-देवता सोमरस प्राशन करत असल्याचे संदर्भ आढळतात. परंतु, सोमरस आणि दारूत साधर्म्य असल्याचे सांगत पिणा-यानी आपला मार्ग मोकळा केलाय. शिवाय,मद्यपानाचं देव-देवतांशी तादात्म्य जोडून वैध असल्याचा आविर्भावही त्यांच्यात दिसून येतो. वैदिक काळात पंचशुद्धीला अधिक महत्व दिलं जात होतं. चारित्र्य संपन्नतेला प्राधान्य दिलं जायचं. त्यामुळे उन्माद आणणारं पेय त्या काळात सेवन केलं जातं होतं का? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. म्हणूनच सोमरस नक्की काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.
धार्मिक ग्रंथांमधून मद्यपानाची, उन्माद आणणा-या पदार्थाच्या सेवनाची सर्वत्र निंदाचं करण्यात आली आहे. वेदांमध्ये सोमरसाला अनन्य साधारण महत्व आहे. सोम एक औषधी वनस्पती असल्याचं वेद-पुराणातील उल्लेखांमधून स्पष्ट होते. सोम या वनस्पतीला चमत्कारी वनौषधी असंही संबोधलं जातं.
ऋग्वेदामध्ये मादक पदार्थाविषयी काय म्हटलंय...
।।हृत्सु पीतासो युध्यन्ते दुर्मदासो न सुरायाम्।।
सुरा म्हणजे नशा आणणारा पदार्थ. सुरापान करणारे किंवा मद्यपान करणारे नेहमीच भांडण, मारामारी आणि हिंसा करतात.
ऋग्वेदामध्ये सोमरसाविषयी काय म्हटलंय...
।।शतं वा य: शुचीनां सहस्रं वा समाशिराम्। एदुनिम्नं न रीयते।। (ऋग्वेद-1/30/2)
दही आणि दुग्ध मिश्रित सोमरसाचे अनेक घडे इंद्रदेवाला प्राप्त होवोत, असं आवाहन करण्यात आलंय. सोमरसात दही-दूध मिश्रित करण्याचं म्हटलंय. दारूत दूध-दही घातले जात नाही, हे सर्वश्रुत आहे. भांग दूध घालून पिण्यात येते. पण त्यात दही घातल्याचे आजवर तरी ऐकण्यात आले नाही.
।।औषधि: सोम: सुनोते: पदेनमभिशुण्वन्ति।- निरुक्त शास्त्र (11-2-2)
सोम एक औषधी आहे. ज्याला कुटून आणि दळून त्याचा रस काढण्यात येत असे. दुग्ध मिश्रित सोम म्हणजे ‘गवशिरम्’ तर दही मिश्रित सोम म्हणजे ‘दध्यशिरम्’ बनवले जात होते. शुद्ध तूप आणि मध घालूनही सोमरस तयार करण्यात येत असे. याचा अर्थ असा की, मदिरा, सुरा, भांग किंवा दारू या कशातही दही, मध आणि तूप घालण्यात येत नाही. या उलट सोम, दुध, दही, तूप आणि मध यांच्या मिश्रणातून सोमरस तयार करण्यात येत असे. म्हणजे, सोमरस हे दारू किंवा भांग असा मादक-उन्माद आणणारा हानिकारक पदार्थ नव्हे, हे लक्षात घ्यायला हवं. आता दारू ही हानिकारक आहे, असं कोणं म्हणतो? असा वाद निर्माण होऊ शकतो. पण किमान भारतात दारूमुळे होणारे दुष्परिणाम पाहता, 'हानिकारक' हा शब्दप्रयोग याग्य ठरावा.
ऋग्वेदातील एक संदर्भानूसार...
देव-दानवांना स्फुर्ती आणि प्रेरणा देणारा रस, असं सोमरसाचं वैशिष्ट्य होतं. इंद्र सोमरसाचं प्राशन करून अधिक पराक्रमी बनतो. म्हणून इंद्रदेवाला सोमरस अर्पण करतात.
"स्वादुष्किलायं मधुमां उतायम्, तीव्र: किलायं रसवां उतायम। उतोन्वस्य पपिवांसमिन्द्रम, न कश्चन सहत आहवेषु"
म्हणजे सोम अतिशय स्वादिष्ट, मधुर आणि रसाळ आहे. सोमरसपान करणारा बलवान आणि अपराजीत बनतो. तारूण्य बहाल करणारा, सात्विक, अत्यंत बलवर्धक, आयुवर्धक, अन्नदोषाचा प्रभाव नष्ट करणारा असा हा ‘सोमरस’.शरीर रक्षण, आरोग्य प्रदान करणारा, संकटांना दूर पळविणारा, बलशाली, आनंद देणारा, संपत्ती संवर्धन करणारा, ऋषीत्व आणि अमरत्व प्रदान करणा-या सोमरसाचे असे अनेक गुणधर्म कण्व ऋषींनी सांगितले आहेत.
सोम वनस्पतीची संजिवनी वनस्पतीशीही तुलना करण्यात आली आहे. ऋग्वेदानूसार सोम वनस्पतीच्या उत्पत्तीचे दोन प्रमुख स्थान सांगितले आहेत. एक स्वर्ग आणि दुरसे पार्थिव पर्वत. अर्थात, पृथ्वीवरील पर्वत श्रृंखला. सोम अग्नीप्रमाणेच स्वर्गातून पृथ्वीवर आल्याचं ऋग्वेदात सांगण्यात आलयं. मुजवंत पर्वत (गांधार-कम्बोज प्रदेश) हे सोम वनस्पतीचे पृथ्वीवरील पार्थिव स्थान. (ऋग्वेद अध्याय सोम मंडल- 4, 5, 6) वेदांमध्ये वर्णित सोमरसची वनस्पती अफगणिस्तानातील टेकड्यांवर आढळली आहे. काही वर्षांपूर्वी ईराणमध्ये काही लोक इंफेड्रा नामक झाडाची तुलना सोम वनस्पतीशी करत असतं. तुर्कमेनिस्तानमधील तुगलक-21 मंदिर परिसरात मातीच्या काही भांड्यांमध्ये इंफेड्रा झाडांच्या लहान-लहान फांद्या आढळल्या. या भांड्यांचा उपयोग पूर्वी सोमरसाच्या अधिष्ठानाकरीता करण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते. या पुराव्यांसंदर्भात पुढे संशोधनही सुरू आहे.

सोमविषयी काही पौराणिक कथाही प्रचलित आहेत. वराह पुराणात सोमच्या उत्पत्तीचं वर्णन करण्यात आले आहे. सोम दक्षाच्या शापामुळे क्षय पावून लुप्त झाला. त्याच्या नष्ट होण्याने देव, मनुष्य, पशु, वृक्ष विषेशत: औषधी वनस्पती क्षीण झाल्या. त्यावर चिंतित देव-देवतांना विष्णूने समुद्र मंथनाचा पर्याय सुचविला. समुद्र मंथनातून पुन्हा सोमची उत्पत्ती झाली. वरील दाखले विचारात घेता, सोमरसाची तुलना दारूशी करणं संयुक्तिक ठरणार नाही. सोमरसामुळे निरोगी, बलवान स्फुर्ती आणि प्रेरणा देणारा, सात्विकता आणि अमरत्व प्राप्त करून देणारा हा सर आध्यात्मिक आणि व्यवहारिक अर्थाने उपयोगी ठरणारा आहे.