मंगलवार, 3 मार्च 2020

मूर्ख लक्षणे

॥ श्रीराम ॥
ॐ नमोजि गजानना । येकदंता त्रिनयना । 
कृपादृष्टि भक्तजना अवलोकावें ॥ १॥
तुज नमूं वेदमाते । । श्रीशारदे ब्रह्मसुते । 
अंतरी वसे कृपावंते । स्फूर्तिरूपें ॥ २॥
वंदून सद्गुरुचरण । करून रघुनाथस्मरण । 
त्यागार्थ मूर्खलक्षण । बोलिजेल ॥ ३॥
येक मूर्ख येक पढतमूर्ख । उभय लक्षणीं कौतुक । 
श्रोतीं सादर विवेक । केला पाहिजे ॥ ४॥
पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण । 
साअवध होऊनि विचक्षण । परिसोत पुढें ॥ ५॥
आतां प्रस्तुत विचार । लक्षणें सांगतां अपार । 
परि कांहीं येक तत्पर । होऊन ऐका ॥ ६॥
जे प्रपंचिक जन । जयांस नाहीं आत्मज्ञान । 
जे केवळ अज्ञान । त्यांचीं लक्षणें ॥ ७॥
जन्मला जयांचे उदरीं । तयासि जो विरोध करी । 
सखी मनिली अंतुरी । तो येक मूर्ख ॥ ८॥
सांडून सर्वही गोत । स्त्रीआधेन जीवित । 
सांगे अंतरींची मात । तो येक मूर्ख ॥ ९॥
परस्त्रीसीं प्रेमा धरी । श्वशुरगृही वास करी । 
कुळेंविण कन्या वरी । तो येक मूर्ख ॥ १०॥
समर्थावरी अहंता । अंतरीं मानी समता । 
सामर्थ्येंविण करी सत्ता । तो येक मूर्ख ॥ ११॥
आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति । 
सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख ॥ १२॥
अकारण हास्य करी । विवेक सांगतां न धरी । 
जो बहुतांचा वैरी । तो येक मूर्ख ॥ १३॥
आपुलीं धरूनियां दुरी । पराव्यासीं करी मीत्री । 
परन्यून बोले रात्रीं । तो येक मूर्ख ॥ १४॥
बहुत जागते जन । तयांमध्यें करी शयन । 
परस्थळीं बहु भोजन- । करी, तो येक मूर्ख ॥ १५॥
मान अथवा अपमान । स्वयें करी परिच्छिन्न । 
सप्त वेसनीं जयाचें मन । तो येक मूर्ख ॥ १६॥
धरून परावी आस । प्रेत्न सांडी सावकास । 
निसुगाईचा संतोष- । मानी, तो येक मूर्ख ॥ १७॥
घरीं विवेक उमजे । आणि सभेमध्यें लाजे । 
शब्द बोलतां निर्बुजे । तो येक मूर्ख ॥ १८॥
आपणाहून जो श्रेष्ठ । तयासीं अत्यंत निकट । 
सिकवेणेचा मानी वीट । तो येक मूर्ख ॥ १९॥
नायेके त्यांसी सिकवी । वडिलांसी जाणीव दावी । 
जो आरजास गोवी । तो येक मूर्ख ॥ २०॥
येकायेकीं येकसरा । जाला विषईं निलाजिरा । 
मर्यादा सांडून सैरा- । वर्ते, तो येक मूर्ख ॥ २१॥
औषध न घे असोन वेथा । पथ्य न करी सर्वथा । 
न मिळे आलिया पदार्था । तो येक मूर्ख ॥ २२ । 
संगेंविण विदेश करी । वोळखीविण संग धरी । 
उडी घाली माहापुरीं । तो येक मूर्ख ॥ २३॥
आपणास जेथें मान । तेथें अखंड करी गमन । 
रक्षूं नेणे मानाभिमान । तो येक मूर्ख ॥ २४॥
सेवक जाला लक्ष्मीवंत । तयाचा होय अंकित । 
सर्वकाळ दुश्चित्त । तो येक मूर्ख ॥ २५॥
विचार न करितां कारण । दंड करी अपराधेंविण । 
स्वल्पासाठीं जो कृपण । तो येक मूर्ख ॥ २६॥
देवलंड पितृलंड । शक्तिवीण करी तोड । 
ज्याचे मुखीं भंडउभंड । तो येक मूर्ख ॥ २७॥
घरीच्यावरी खाय दाढा । बाहेरी दीन बापुडा । 
ऐसा जो कां वेड मूढा । तो येक मूर्ख ॥ २८॥
नीच यातीसीं सांगात । परांगनेसीं येकांत । 
मार्गें जाय खात खात । तो येक मूर्ख ॥ २९॥
स्वयें नेणे परोपकार । उपकाराचा अनोपकार । 
करी थोडें बोले फार । तो येक मूर्ख ॥ ३०॥
तपीळ खादाड आळसी । कुश्चीळ कुटीळ मानसीं । 
धारीष्ट नाहीं जयापासीं । तो येक मूर्ख ॥ ३१॥
विद्या वैभव ना धन । पुरुषार्थ सामर्थ्य ना मान । 
कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ३२॥
लंडी लटिका लाबाड । कुकर्मी कुटीळ निचाड । 
निद्रा जयाची वाड । तो येक मूर्ख ॥ ३३॥
उंचीं जाऊन वस्त्र नेसे । चौबारां बाहेरी बैसे । 
सर्वकाळ नग्न दिसे । तो येक मूर्ख ॥ ३४॥
दंत चक्षु आणी घ्राण । पाणी वसन आणी चरण । 
सर्वकाळ जयाचे मळिण । तो येक मूर्ख ॥ ३५॥
वैधृति आणी वितिपात । नाना कुमुहूर्तें जात । 
अपशकुनें करी घात । तो येक मूर्ख ॥ ३६॥
क्रोधें अपमानें कुबुद्धि । आपणास आपण वधी । 
जयास नाहीं दृढ बुद्धि । तो येक मूर्ख ॥ ३७॥
जिवलगांस परम खेदी । सुखाचा शब्द तोहि नेदी । 
नीच जनास वंदी । तो येक मूर्ख ॥ ३८॥
आपणास राखे परोपरी । शरणागतांस अव्हेरी । 
लक्ष्मीचा भरवसा धरी । तो येक मूर्ख ॥ ३९॥
पुत्र कळत्र आणी दारा । इतुकाचि मानुनियां थारा । 
विसरोन गेला ईश्वरा । तो येक मूर्ख ॥ ४०॥
जैसें जैसें करावें । तैसें तैसें पावाअवें । 
हे जयास नेणवे । तो येक मूर्ख ॥ ४१॥
पुरुषाचेनि अष्टगुणें । स्त्रियांस ईश्वरी देणें । 
ऐशा केल्या बहुत जेणें । तो येक मूर्ख ॥ ४२॥
दुर्जनाचेनि बोलें । मर्यादा सांडून चाले । 
दिवसा झांकिले डोळे । तो येक मूर्ख ॥ ४३॥
देवद्रोही गुरुद्रोही । मातृद्रोही पितृद्रोही । 
ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही । तो येक मूर्ख ॥ ४४॥
परपीडेचें मानी सुख । पससंतोषाचें मानी दुःख । 
गेले वस्तूचा करी शोक । तो येक मूर्ख ॥ ४५॥
आदरेंविण बोलणें । न पुसतां साअक्ष देणें । 
निंद्य वस्तु आंगिकारणें । तो येक मूर्ख ॥ ४६॥
तुक तोडून बोले । मार्ग सांडून चाले । 
कुकर्मी मित्र केले । तो येक मूर्ख ॥ ४७॥
पत्य राखों नेणें कदा । विनोद करी सर्वदा । 
हासतां खिजे पेटे द्वंदा । तो येक मूर्ख ॥ ४८॥
होड घाली अवघड । काजेंविण करी बडबड । 
बोलोंचि नेणे मुखजड । तो येक मूर्ख ॥ ४९॥
वस्त्र शास्त्र दोनी नसे । उंचे स्थळीं जाऊन बैसे । 
जो गोत्रजांस विश्वासे । तो येक मूर्ख ॥ ५०॥
तश्करासी वोळखी सांगे । देखिली वस्तु तेचि मागे । 
आपलें आन्हीत करी रागें । तो येक मूर्ख ॥ ५१॥
हीन जनासीं बरोबरी । बोल बोले सरोत्तरीं । 
वामहस्तें प्राशन करी । तो येक मूर्ख ॥ ५२॥
समर्थासीं मत्सर धरी । अलभ्य वस्तूचा हेवा करी । 
घरीचा घरीं करी चोरी । तो येक मूर्ख ॥ ५३॥
सांडूनियां जगदीशा । मनुष्याचा मानी भर्वसा । 
सार्थकेंविण वेंची वयसा । तो येक मूर्ख ॥ ५४॥
संसारदुःखाचेनि गुणें । देवास गाळी देणें । 
मैत्राचें बोले उणें । तो येक मूर्ख ॥ ५५॥
अल्प अन्याय क्ष्मा न करी । सर्वकाळ धारकीं धरी । 
जो विस्वासघात करी । तो येक मूर्ख ॥ ५६॥
समर्थाचे मनींचे तुटे । जयाचेनि सभा विटे । 
क्षणा बरा क्षणा पालटे । तो येक मूर्ख ॥ ५७॥
बहुतां दिवसांचे सेवक । त्यागून ठेवी आणिक । 
ज्याची सभा निर्नायेक । तो येक मूर्ख ॥ ५८॥
अनीतीनें द्रव्य जोडी । धर्म नीति न्याय सोडी । 
संगतीचें मनुष्य तोडी । तो येक मूर्ख ॥ ५९॥
घरीं असोन सुंदरी । जो सदांचा परद्वारी । 
बहुतांचे उच्छिष्ट अंगीकारी । तो येक मूर्ख ॥ ६०॥
आपुलें अर्थ दुसर्यापासीं । आणी दुसर्याचें अभिळासी । 
पर्वत करी हीनासी । तो येक मूर्ख ॥ ६१॥
अतिताचा अंत पाहे । कुग्रामामधें राहे । 
सर्वकाळ चिंता वाहे । तो येक मूर्ख ॥ ६२॥
दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें । 
डोई खाजवी दोहीं हातें । तो येक मूर्ख ॥ ६३॥
उदकामधें सांडी गुरळी । पायें पायें कांडोळी । 
सेवा करी हीन कुळीं । तो येक मूर्ख ॥ ६४॥
स्त्री बाळका सलगी देणें । पिशाच्या सन्निध बैसणें । 
मर्यादेविण पाळी सुणें । तो येक मूर्ख ॥ ६५॥
परस्त्रीसीं कळह करी । मुकी वस्तु निघातें मारी । 
मूर्खाची संगती धरी । तो येक मूर्ख ॥ ६६॥
कळह पाहात उभा राहे । तोडविना कौतुक पाहे । 
खरें अस्ता खोटें साहे । तो येक मूर्ख ॥ ६७॥
लक्ष्मी आलियावरी । जो मागील वोळखी न धरी । 
देवीं ब्राह्मणीं सत्ता करी । तो येक मूर्ख ॥ ६८॥
आपलें काज होये तंवरी । बहुसाल नम्रता धरी । 
पुढीलांचें कार्य न करी । तो येक मूर्ख ॥ ६९॥
अक्षरें गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं । 
नीघा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ॥ ७०॥
आपण वाचीना कधीं । कोणास वाचावया नेदी । 
बांधोन ठेवी बंदीं । तो येक मूर्ख ॥ ७१॥
ऐसीं हें मूर्खलक्षणें । श्रवणें चातुर्य बाणे । 
चीत्त देउनियां शहाणे । ऐकती सदा ॥ ७२॥
लक्षणें अपार असती । परी कांहीं येक येथामती । 
त्यागार्थ बोलिलें श्रोतीं । क्ष्मा केलें पाहिजे ॥ ७३॥
उत्तम लक्षणें घ्यावीं । मूर्खलक्षणें त्यागावीं । 
पुढिले समासी आघवीं । निरोपिलीं ॥ ७४॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 
मूर्खलक्षणनाम समास पहिला ॥ १॥

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें